लोणंद (ता. खंडाळा): सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे शाळा सुटल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर हुल्लडबाजी होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकींवर ट्रिपल सीट बसून विद्यार्थी बाजारपेठेतून तसेच मुख्य रस्त्यांवरून बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे ही सर्व हुल्लडबाजी स्थानिक पोलीस स्टेशनपासून अगदी काही अंतरावर घडत असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. विद्यार्थी सार्वजनिक रस्त्यांवर वेगाने वाहन चालवून इतर वाहनचालकांना धोक्यात टाकत आहेत. या प्रकारामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर मुलांच्या या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे.
राज्यात मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये आणि अल्पवयीन गुन्हेगारांच्या प्रमाणात वाढ होत असताना लोणंदमधील हा प्रकार आणखी चिंतेचा विषय बनला आहे. मुलांच्या अशा वागणुकीला पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्याकडूनही वेळीच रोखले गेले पाहिजे. मात्र, पोलिसांची बघ्याची भूमिका अधिक चिंताजनक आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे मुलांना बेदरकारपणे वागण्याचा अधिक आत्मविश्वास मिळत आहे.
या संदर्भात नागरिकांनी अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही. पोलिसांनी वेळीच या विद्यार्थ्यांवर कारवाई करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या मुलांवर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना नियमांचे पालन करण्याची शिकवण द्यावी.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने बाजारपेठेतील व शाळेजवळील रस्त्यांवर गस्त वाढवून शिस्तबद्धता राखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास या प्रकारामुळे गंभीर अपघात किंवा अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.