शिरवळ : शिरवळ परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अशी एक घटना शिरवळमध्ये घडली असून तब्बल 12 लाख रुपयांच्या वऱ्हाच्या चोरीची घटना समोर आली आहे. चोरीची घटना घडल्यानंतर सहा दिवसानंतर अखेर दत्तात्रय माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळशी रोडलगतच्या म्हारकी शिवारात दत्तात्रय माने यांनी भाड्याने घेतलेल्या शेतात वराह पालन व्यवसाय सुरू केला होता. 2 जानेवारी रोजी रात्री शेडला कुलूप लावून ते घरी गेले. मात्र, 3 जानेवारी रोजी पहाटे कामगार भरत वाघे याचा फोन आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. कामगार भरत वाघे यांनी सांगितले की, मध्यरात्री 1 वाजता प्रकाश जाधव, त्याचा भाऊ मयूर जाधव, सोन्या पवार, सचिन ऊर्फ बाळा जाधव, आणि 5-7 अनोळखी इसम शेडमध्ये जबरदस्तीने घुसले. त्यांनी भरत वाघे व त्याची मुलगी तनयाला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांनी शेडमधील वराह पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीत भरले. चोरीचा प्रकार तब्बल दोन तास चालू होता. चोरी गेलेल्या वराहांमध्ये लार्ज व्हाईट यॉर्कशायर प्रजातीचे 100 वराह (1 वर्षाहून अधिक वयाचे), 50 वराह (9-10 महिन्यांचे), आणि 43 वराह (6 महिन्यांचे) यांचा समावेश आहे. एकूण 12 लाख रुपये किमतीच्या या वराहांची चोरी केल्या प्रकरणी प्रकाश जाधव, त्याचा भाऊ मयूर जाधव, सोन्या पवार, सचिन ऊर्फ बाळा जाधव, आणि 5-7 अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.
गुन्हा दाखल करण्यास सह दिवसांचा विलंब. तर संशयितांना मारहाण
शिरवळ पोलिस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असते तर शिरवळ पोलिसांनी दोन तारखेच्या मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल करून घेण्यास सुमारे सहा दिवस लावले. यामध्ये संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करण्यात आली या नंतर सहा तारखेला रात्री संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी मारहाण देखील केल्याचे ऐका संशयिताने बोलताना सांगितले यामुळे शिरवळ पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.