खंडाळा : शिरवळ आणि पिसाळवाडी हद्दीत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात चोरी करत दहशत निर्माण केली आहे. या भागातील एका सोन्याच्या दुकानासह चार मेडिकल दुकानांमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यामध्ये शिरवळ येथील एसके ज्वेलर्समधून सुमारे ३ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या. तसेच, चार मेडिकल दुकानांमधून रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरले गेले आहे.
पिसाळवाडी गावाच्या हद्दीत चोरट्यांनी ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार आणि केबल वायर चोरली. याशिवाय मच्छीमारीसाठी वापरली जाणारी अंदाजे ६० हजार रुपयांची बोट देखील गायब झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शटर उचकटून चोरी केल्याचे दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातारा येथून श्वानपथक आणि ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही तपासासाठी घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा त्वरित शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाने सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे शिरवळ-पिसाळवाडी परिसरातील नागरिक सतर्क झाले असून, पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेचा तपास सुरू असून पोलिस लवकरच चोरट्यांचा पर्दाफाश करतील, अशी अपेक्षा आहे.