सातारा : पाचगणी येथील हॉटेल हिराबागमध्ये तब्बल १२ बारबाला नाचवून डान्सबारचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या टोळक्याचा डाव पाचगणी पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात हॉटेल मालकासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाचगणी हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून, येथे गायिका आणि महिला वेटरच्या नावाखाली बारबालांना नृत्यासाठी आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पाचगणी पोलिसांनी सतर्कता बाळगली. ७ जानेवारी रोजी हॉटेल हिराबाग येथे अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मिळाल्यावर सपोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथक तयार केले.
हॉटेल हिराबाग येथे छापा टाकल्यावर पोलिसांना हॉलमध्ये १२ बारबाला उत्तान कपड्यात आढळल्या. त्या संगीताच्या तालावर बीभत्स हावभाव करत नाचत होत्या. या वेळी २० गिर्हाईके हजर होती. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात येताच काहींनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून सर्वांना ताब्यात घेतले. या कारवाईत साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल, कार असा २५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्ष (बाररूम) मधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणाऱ्या कायद्यानुसार तसेच महिला प्रतिष्ठेच्या संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत फौजदार बालाजी सोनुने, पोलिस रविंद्र कदम, श्रीकांत कांबळे, कैलास रसाळ, विनोद पवार आदींनी सहभाग घेतला.
दरम्यान, तपासात उघड झाले की, संशयितांपैकी काही जण खत दुकानदार असून ते माळशिरस, तासगाव आणि जत येथील आहेत. या घटनेमुळे डान्सबार आयोजनासाठी आर्थिक पाठबळ देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.