शिरवळ, दि. १३ (प्रतिनिधी): तालुक्यातील केसुर्डी, ता. खंडाळा येथे कंपनीच्या कामाचा ठेका घेण्यावरून वादातून लोखंडी हत्याराने हल्ला करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही गटातील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसुर्डी येथील एका कंपनीच्या कामावरून हा वाद उफाळून आला. फिर्यादी प्रशांत रमेश ढमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १० जानेवारी रोजी कंपनीच्या जागेवर तेजस संजय ढमाळ, संजय तुकाराम ढमाळ व अन्य साथीदारांनी लोखंडी हत्यारे व रॉड घेऊन हल्ला केला. अनिकेत भंडारे यांच्यावर वाद घालत मारहाण करत, दशरथ जाधव व विनय जाधव यांनाही जखमी केले. यावेळी संजय ढमाळ यांनी कोयत्याने हल्ला करत प्रशांत ढमाळ यांना कानावर मारले.
त्यानंतर तेजस ढमाळ यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या तक्रारीत, प्रशांत रमेश ढमाळ, भूषण संदिप ढमाळ आणि माजी सरपंच गणेश रमेश ढमाळ यांच्यासह १३ जणांवर आरोप करण्यात आला आहे. या गटाने शिवीगाळ, दमदाटी करत “कंपनीचे काम आम्ही करणार” असे म्हणत मारहाण केल्याचे म्हटले आहे. यात गौरव ढमाळ व साहिल शेडगे जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सपकाळ अधिक तपास करत आहेत.याशिवाय कंपनी प्रशासनाकडूनही संबंधित घटनेबाबत शिरवळ पोलिसांना तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या घटनेमुळे केसुर्डी परिसरात भीतीचे वातावरण असून, वादावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.