लोणंद (ता. खंडाळा) : येथील जाधव आळीत दिव्यांग महिलेवर हल्ला करून तिचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करून तिला अटक केली आहे. अंजली शेखर घोडके (रा. लोणंद) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव असून तिच्याकडून चोरीस गेलेला मंगळसूत्र जप्त करण्यात आला आहे.
ही घटना लोणंदमधील मनोज शरद घुले यांच्या घरी घडली. संशयित अंजली घोडके ही महिलेने मनोज यांच्या दिव्यांग आई प्रेमा घुले यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती.
घटनेनंतर मनोज घुले यांनी लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अंजली घोडके हिच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिली.
संशयितेकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले आहे. या यशस्वी कारवाईत हवालदार संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, अभिजित घनवट, अमोल जाधव, शुभांगी धायगुडे आणि आशा शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अंजली घोडके हिला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या त्वरित कारवाईचे कौतुक केले आहे. या प्रकारामुळे परिसरात नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.