शिरवळ (ता. खंडाळा) : केसुर्डी MIDC येथील डेटविलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शिरवळ केसुर्डी या बहुराष्ट्रीय कंपनीवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश जाधव यांनी केली आहे. त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन देत तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,डेटविलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शिरवळ केसुर्डी कंपनीच्या प्रांगणात भारतीय राष्ट्रध्वजासोबत कंपनीच्या लोगो असलेले दोन इतर झेंडे फडकावले गेले होते. हा प्रकार भारतीय ध्वज संहिता २०२४ आणि राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक अधिनियम १९७१ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ध्वज संहिता २०२४ च्या भाग दोन, कलम (१) मधील 212 (५) नुसार, राष्ट्रध्वजासोबत कोणताही अन्य झेंडा फडकावणे हा कायद्याचा भंग मानला जातो. डेटविलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शिरवळ केसुर्डी कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात श्री जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाचा सर्वोच्च मान राखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. राष्ट्रध्वज हा देशाच्या अस्मितेचे प्रतीक असल्याने त्याचा अवमान सहन केला जाणार नाही, असेही जाधव यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे, मात्र कंपनी व्यवस्थापनाची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
या अगोदरही घडला होता असा प्रकार…
राष्ट्रप्रतिष्टा अवमान प्रतिबंधक अधिनियम १९७१, भारतीय ध्वज संहिता २०२४ भाग दोन कलम (१) मधील 212 (५) नुसार तसेच केंद्रीय गृह विभाग निर्देशानुसार कलम 3:32 नुसार भारतीय राष्ट्रध्वजा चे बाजुला कोणताही झेंडा फडकावता येत नाही. असेच एका प्रकरणांमध्ये खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एमआयडीसी मधील थरमॅक्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यामध्ये खंडाळा न्यायालयाने शिक्षा देखील सुनावण्यात आलेली आहे.