शिरवळ: महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिरवळ एमआयडीसीतील टी.ई. कनेक्टिव्हिटी कंपनीत ‘महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा, २०१३’ या विषयावर महत्त्वपूर्ण जनजागृती व कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा विधी सेवा प्राधिकरण, विशाखा समिती आणि शिरवळ पोलिस यांच्या वतीने घेण्यात आली.
महिलांना POSH कायद्याची सखोल माहिती देऊन त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक करणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. POSH कायदा, २०१३ च्या माध्यमातून महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळते. या कायद्यात तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया, लैंगिक छळाची व्याख्या आणि प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना यांचा समावेश आहे.
कार्यशाळेत ॲड. मनीषा बर्गी यांनी POSH कायद्याच्या महत्वाविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी कायद्याचे निकष, तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया आणि महिलांसाठी उपलब्ध कायदेशीर पर्याय याची विस्तृत माहिती दिली. महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कसे उभे राहावे यावरही त्यांनी भर दिला.
पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी मानसिक, शारीरिक किंवा वर्तणुकीशी संबंधित त्रास ओळखण्यासाठी आवश्यक ती दक्षता आणि कायदेशीर मार्गांचा उपयोग करण्याचे महत्व स्पष्ट केले. याशिवाय, प्रज्ञा काटे यांनी बाल लैंगिक अत्याचारांच्या मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.महिलांच्या सक्षमीकरणासाठी POSH कायद्याच्या जनजागृतीच्या माध्यमातून महिलांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. महिलांच्या हक्कांची जाणीव आणि सुरक्षिततेचा मुद्दा उजळवण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.
कार्यशाळेला विधी सेवा प्राधिकरण ॲड. मनीषा बर्गे, विशाखा समिती सदस्य पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलिस उपनिरीक्षक सपना दांगट, प्रज्ञा काटे,संजय होण, आणि दीपक पालेपवाड, विशाल काटे यांसह अनेक महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.