शिरवळ: सातारा जिल्ह्यातील शिरवळ हे औद्योगिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून वेगाने विकसित होणारे शहर आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणासोबतच येथे अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत असून, अवैध गॅस सिलेंडर विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गॅस सिलेंडर हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने त्याच्या गैरवापरामुळे मोठ्या दुर्घटनांचा धोका आहे. तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा आर्थिक संगनमतामुळे हा व्यवसाय जोमात सुरू असल्याच नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
शिरवळ आणि आसपासच्या भागातील अनेक हॉटेल्स, लहान उद्योग आणि घरगुती ग्राहक अवैध मार्गाने गॅस सिलेंडर विकत घेत आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर अधिक कर असल्याने काही उद्योजक घरगुती सिलेंडरचा गैरवापर करतात. परिणामी, दलाल आणि काही गॅस एजन्सी मिळून सिलेंडर काळ्या बाजारात महाग दराने विकतात. यामुळे सरकारचा महसूल बुडत असून, अधिकृत ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नाही.
प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
काही नागरिकांच्या मते, हा प्रकार लाचखोरीशिवाय अशक्य आहे. “रस्त्यावर खुलेआम काळ्या बाजारात सिलेंडर विक्री सुरू असते, पण प्रशासन काही करत नाही. याचा अर्थ यंत्रणांना याची माहिती असूनही त्यांनी डोळेझाक केली आहे,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.गॅस एजन्सी आणि दलाल यांच्यातील संगनमतामुळे हा व्यवसाय जोमात सुरू असून, वितरण व्यवस्थेतील त्रुटींचा गैरफायदा घेतला जात आहे.
प्रशासनाचे आश्वासन, पण नागरिकांचा अविश्वास
वारंवार तक्रारी नंतर या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले जातात, लवकरच कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली असून, त्यावर काही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे या वेळेसही केवळ आश्वासन देऊन प्रकरण दडपले जाणार का, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.या गंभीर विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या काळात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
क्रमशः पुढील भाग गॅस एजन्सी आणि दलालांचे संगनमत?