सातारा प्राईम न्यूज च्या बातमी नंतर पुरवठा विभागाची कारवाई..
शिरवळ (ता. खंडाळा) – सांगवी येथील दत्तनगर परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर भरले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खंडाळा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर आणि संबंधित साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीलदार अजित पाटील यांच्या आदेशाने खंडाळा नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी स्मिता आगाशे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, एमएच ११ एक ७८३६ क्रमांकाच्या मारुती ओम्नी वाहनात भारत गॅस कंपनीचे २५ सिलेंडर आढळले. त्याशिवाय, श्रीनाथ होम अप्लायन्सेस आणि ओम साई होम अप्लायन्सेस या दुकानांमध्ये २३ अनधिकृतपणे भरलेले व २६ रिकामे गॅस सिलेंडर तसेच ४ व्यवसायिक गॅस सिलेंडर आणि ३ खासगी कंपनीचे सिलेंडर आढळले.
यासोबतच, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे दोन लोखंडी यंत्र, एक गॅस रिफिलिंग मशीन, रबर पाईप, इलेक्ट्रिक वजन काटा आणि लोखंडी रिफिलिंग पिनही आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे ४ लाख ४० हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करण्यासाठी कोणताही अधिकृत परवाना अथवा करारनामा न ठेवता ही प्रक्रिया सुरू असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अंजली ओमप्रकाश पासवान आणि अशोक आप्पाराय गवळी (दोघे रा. दत्तनगर, सांगवी) यांच्या विरोधात स्मिता आगाशे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई सातारा प्राईम न्यूजच्या बातमीनंतर तहसीलदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार स्मिता आगाशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या यशस्वी कारवाईमुळे बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.