शिरवळ – शहर व परिसरात बेकायदेशीर गॅस सिलेंडर रिफिलिंग आणि विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या बाबत सातारा प्राईम न्युजने विशेष मालिका सुरू असून त्यातील आजचा तिसरा भाग आहे. मागील बातमी नंतर प्रशासनाने कठोर पावले उचलत कारवाईचा बडगा उगारला परंतु यामध्ये विशेष म्हणजे, हा व्यवसाय स्थानिक पोलिसांच्या पाठिंब्यामुळेच जोमात सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. किरकोळ नफ्यासाठी काही लोक नागरिकांच्या जीवाशी खेळत असून, या पोलिस कर्मचाऱ्याच्या पाठबळामुळे हे व्यावसायिक निर्ढावले आहेत .
आपल्या बातमी नंतर नुकत्याच झालेल्या कारवाईत पुरवठा विभागाने दोन अनधिकृत गॅस विक्रेत्यांवर धाड टाकून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी शिरवळ पोलिस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याला आम्ही आर्थिक मोबदला देत असल्या बाबत चर्चा तेथील व्यवसायिकांत रंगलेली पाहायला मिळाली .गेल्या पाच वर्षांपासून हा धंदा बिनधास्त सुरू असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र कारवाई होत नव्हती. यामागे स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात या धंद्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
अवैध गॅस सिलेंडरचा वापर हा केवळ नियमभंग नाही, तर मोठा धोका आहे. चुकीच्या पद्धतीने साठवलेले सिलेंडर गळतीमुळे स्फोट होण्याची शक्यता असते, ज्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतो. अशा घटनांमुळे गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, उपविभागीय अधिकारी, वाई यांनी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर, पोलिसांची विश्वासार्हता आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस आणि प्रशासनाने एकत्र येऊन या अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही सतर्क राहून अशा प्रकरणांची तक्रार संबंधित विभागाकडे करावी, जेणेकरून भविष्यात मोठ्या दुर्घटनांना आळा बसू शकेल. प्रशासनाने यासंदर्भात अधिक कठोर पावले उचलली, तरच नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास पुन्हा दृढ होईल.
अवैध गॅस विक्रेत्यांचा नवीनच फंडा – “पत्रकार साहेब, तुम्ही फक्त शांत बसा… प्रशासन आमच्या खिशात!”
शहरात अवैध गॅस विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, हे विक्रेते कोणत्याही भीतीशिवाय बिनधास्त व्यवसाय करताना दिसत आहेत. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या विक्रेत्यांनी आता प्रशासनाशी असे संबंध निर्माण केले आहेत की, त्यांना कुठलीही कारवाईची भीती वाटेनाशी झाली आहे. “पत्रकार साहेब, तुम्ही फक्त शांत बसा, प्रशासन आमच्या खिशात आहे!” असा थेट दावा करून हे विक्रेते मोकळे फिरत आहेत.
नागरिकांची अनास्था?
गॅसचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर वाढत असून, त्याला काही नागरिकही जबाबदार ठरत आहेत. अधिकृत डीलरकडून गॅस मिळण्यास विलंब होत असल्याने काही नागरिक चढ्या दराने काळ्या बाजारातून गॅस खरेदी करतात. या मागणीमुळे अवैध व्यवसायिकांना प्रोत्साहन मिळत असून, गरजू नागरिकांना अधिकृत मार्गाने गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाकडून छापे टाकले जात असले तरी, नागरिकांच्या सहभागामुळे हा गैरव्यवहार थांबत नाही. नागरिकांनी कायदेशीर मार्गानेच गॅस खरेदी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काळ्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
क्रमशः