खंडाळा: तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीतून कामाला सुरुवात केली आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवली आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून लोणंद मंडलामध्ये “शासन आपल्या दारी” या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व शासकीय योजना, दाखले व अन्य सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विशेष आर्थिक सहाय्य योजना, पुरवठा विभागाच्या विविध योजना, Agristack योजनेतील शेतकरी नोंदणी, आधार नोंदणी, सातबारा व प्रमाणित वारस दाखल्यांचे वाटप, वारस फेरफार अदालत यांसारख्या सेवांचा समावेश होता.
या शिबिराच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. लोणंद, खेड बुद्रूक, पाडेगाव, बाळूपाटलाची वाडी, पिंपरे बुद्रूक, मरीआईचीवाडी, निंबोडी, कोपर्डे, पाडळी, बोरी, सुखेड येळेवाडी या महसुली गावांमध्ये याची माहिती पोहोचवण्यात आली. या प्रयत्नांचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि तब्बल ७७१ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडल अधिकारी रूपाली यादव, ग्राम महसूल अधिकारी शशिकांत वणवे, आरती दळवी, सुशांत मोरे, चेतन डोईफोडे, तसेच महसूल व पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पूर्ण केले.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या या सकारात्मक कृतीतून नागरिकांची अडचणीत असलेली अनेक कामे मार्गी लागली. मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराचे तालुक्यात कौतुक होत आहे.