शिरवळ : खंडाळा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत शिरवळ येथील अवैध गॅस सिलेंडर विक्रेत्यावर छापा टाकला. या कारवाईत 200 ते 250 हून अधिक घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अवैध गॅस सिलेंडर विक्रीच्या माहितीच्या आधारे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कारवाई केली. तपासणीदरम्यान एका वाहनातून 46 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. तसेच, एका गोदामात मोठ्या प्रमाणावर घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडर आढळले. एकूण 200 पेक्षा अधिक सिलेंडर आढळल्याने हा मोठा गॅस साठा अनधिकृतरित्या केला जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला आहे.
पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू केले असून, या अवैध गॅस साठ्याच्या स्रोताबाबत चौकशी केली जात आहे. या प्रकरणी गॅस सिलेंडर मालक आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईमुळे शिरवळ आणि परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, अवैध व्यवसायावर प्रशासनाने घेतलेल्या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. पुढील तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
या आगोदरही करण्यात आली होती कारवाई
शिरवळ परिसरात अवैध गॅस सिलेंडर विक्रेत्यांवर मागील काही दिवसापूर्वी धडक कारवाई करत सुमारे 55 अवैद्य सिलेंडर मिळून आले होते त्यामध्ये दोन व्यक्तीवर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे..
विस्तृत नेटवर्क असण्याची शक्यता
या कारवाईमुळे शिरवळसह भोर, पुरंदर, वाई, खंडाळा आणि लोणंद भागातही अवैध गॅस सिलेंडर विक्रीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनेक गॅस एजन्सी या प्रकारात सामील असल्याची शक्यता असून, पुरवठा विभाग पुढील तपास करत आहे.
बातमी अपडेट होत आहे…