शिरवळ, दि. १४: शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमोल आनंदा कबूले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावाच्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील पार्श्वभूमीमुळे ही निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
उपसरपंच ताहेर काझी यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी (दि. १४) रोजी ग्रामपंचायत शिरवळ या ठिकाणी निवडणूक पार पडली.या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र दुधगावकर होते. उपसरपंच पदासाठी अर्ज भरण्याची वेळ ठरवण्यात आली होती, आणि या कालावधीत केवळ एकच अर्ज प्राप्त झाला. अमोल आनंदा कबूले यांनी दिलेला अर्ज हा एकमेव असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी एकमताने त्यांना पाठिंबा दिला. अमोल कबूले यांना सूचक म्हणून राहुल तांबे यांनी तर अनुमोदक म्हणून इतर सदस्यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे त्यांची निवड प्रक्रियेच्या नियमांनुसार अधिकृत करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात उपसरपंच पद महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे अमोल कबूले यांच्याकडून ग्रामविकासाच्या दृष्टीने प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
शिरवळ ग्रामपंचायतीच्या राजकारणात ही निवड शांततापूर्ण आणि एकसंध पद्धतीने झाल्याने गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी सरपंच रविराज दुधगावकर, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, राजेंद्र तांबे , ताहेर काझी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.