खंडाळा, ता. १४: खंडाळा तहसिलदार अजित पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देणारी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांनी नुकतेच वडवाडी (ता. खंडाळा) येथे वर्षानुवर्षे बंद असलेला ९० मीटर लांबीचा पाणंद रस्ता खुला करून ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर केली आहे.
या रस्त्याचा पूर्वीपासून शेती, जनावरे, शेतमाल वाहतूक आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोग होत होता. मात्र, काही वर्षांपूर्वी एका खाजगी व्यक्तीने या रस्त्यावर झाडे, झुडपे आणि दगड टाकून तो अडवला होता. परिणामी, गावकऱ्यांना शेतीसाठी पर्यायी मार्गांचा उपयोग करावा लागत होता. तसेच, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या बंद अवस्थेमुळे अंत्यविधीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.
ग्रामस्थांच्या मागणीवर तहसिलदार अजित पाटील यांनी त्वरित लक्ष घालत वडवाडी येथे प्रत्यक्ष भेट दिली. स्थानिक नागरिक आणि संबंधित व्यक्तींमध्ये समेट घडवून आणत त्यांनी रस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. या तडजोडीतून कित्येक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला.
महसूल प्रशासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध – तहसिलदार अजित पाटील
खंडाळा तहसिलदार अजित पाटील यांनी गेल्या वर्षभरात महसूल प्रशासनाच्या कामकाजातून लोकसंतोष मिळवला आहे. दफ्तरी कामकाज सुरळीत ठेवण्याबरोबरच त्यांनी अवैध गौणखनिज उत्खननावरही आळा घालण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. बावडा, निंबोडी, लोणंद, शिरवळ आणि खंडाळा या गावांमधील बंद पडलेले अनेक पाणंद रस्ते पुन्हा सुरू करून शेतीसाठी उपयोगी केले.
“खंडाळा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासन कटिबद्ध आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून, बंद असलेले पाणंद रस्ते ग्रामहितासाठी खुले करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
– अजित पाटील, तहसिलदार, खंडाळा
ग्रामस्थांनी तहसिलदार पाटील यांच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.