शिरवळ, ता. ४ मार्च २०२५ – शिरवळ पोलिस ठाण्याच्या एका प्रकरणाने पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तालुक्यातील पिसाळवाडी येथे बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर भरण्याच्या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपींची नावे एफआयआरमधून गायब करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री ११.०५ वाजण्याच्या सुमारास पिसाळवाडी येथील गणेश मंदिरासमोरील मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयित आरोपी शुभम गायकवाड (रा. पिसाळवाडी, ता. खंडाळा) व अमित नेवसे (वय ३०, रा. नायगाव, ता. खंडाळा) हे कोणताही अधिकृत परवाना नसताना घरगुती गॅस सिलेंडर भरत असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळी गॅस सिलेंडर, इको गाडी (क्रमांक MH-12 KY-8851) आणि गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ₹१,७१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करत पोलिस शिपाई सूरच चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला.
मात्र, या प्रकरणात वाहन मालकासह गॅस भरण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य संबंधित असलेल्या एका शिक्षकाचे नाव एफआयआरमधून वगळण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकरणात आणखी एक व्यक्तींचा सहभाग असूनही त्यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट न केल्याने पोलिस प्रशासनाच्या निष्पक्षतेवर संशय निर्माण झाला आहे.तर गुन्हा तीन दिवस उशीरा दाखल करण्यात आला आहे.
विचित्र बाब समोर?
या प्रकाराबाबत माहिती घेतली असता पोलिसांनी, ‘संबंधित व्यक्ती शिक्षक असल्याने त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले’ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कायद्याच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्तीला गुन्ह्यातून वगळण्याचे अधिकार पोलिसांकडे नसतात. त्यामुळे संबंधित व्यक्तींना अभय देण्यासाठी दबाव टाकण्यात आला आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
या प्रकारामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
क्रमश: