शिरवळ (ता. खंडाळा) : शिरवळ परिसरात गाजत असलेल्या डॉक्टर हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासात नव्या दोन संशयितांची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सतीश गुलाबराव शेरके सह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी डॉक्टरला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी मुख्य भूमिका बजावल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून काही महत्त्वाचे पुरावेही हस्तगत केले आहेत. याप्रकरणी अजून कोणी गुन्ह्यात सामील आहे का, याचा शोध घेण्यासाठी तपास अधिक खोलात सुरू आहे.
काय होते प्रकरण :
शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका प्रतिष्ठित खाजगी डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा शिरवळ पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी नितीन नवनाथ प्रधान (वय 20) आणि दत्ता आप्पाराव घुगे (वय 24, दोघे रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा) यांना अटक करण्यात आली आहे.
डॉक्टरकडून मागितलेल्या 1 कोटी रुपयांपैकी 1.50 लाख रुपये खंडणीची रक्कम घेण्यासाठी आरोपी प्रधान आणि घुगे हे शिरवळ येथील रामेश्वर गार्डन परिसरात दुचाकीवरून आले होते. यावेळी डॉक्टर व त्यांच्या पत्नीच्या मदतीने शिरवळ पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी आता असलेल्या संशयिताला शिरवळ पोलिसांनी अटक केली असून शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.