शिरवळ : महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी आणि विक्री सुरू असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अशाच एका मोठ्या प्रकरणात, शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळलेल्या अवैध गुटखा साठ्याच्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक करण्यात आली आहे. नीलेश हरकचंद ललवाणी वय . ४२ वर्ष रा.नऱ्हे पुणे. असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, शिरवळ पोलिसांनी पुण्यात त्याचा शोध घेऊन सोमवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकरणी अधिक माहिती अशी की, शिरवळमध्ये एका अपार्टमेंटमधील दोन गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी धाड टाकून १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपयांचा गुटखा आणि गुटखा उत्पादनासाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी आठ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुख्य सूत्रधार निलेश ललवाणी हा फरार होता.
शिरवळ पोलिसांनी कसून तपास करून त्याचा माग काढला आणि अखेर पुण्यात त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला शिरवळ येथे आणून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमुळे गुटख्याच्या अवैध धंद्याविरोधात मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपींवरही कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी आणि विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव सिद करीत आहेत.