शिरवळ (प्रतिनिधी) — शिरवळ पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात महिलांवरील छेडछाडीच्या घटनांनी उंबरठा गाठला असून, मागील काही दिवसांत अंदाजे ६ पीडित तरुणी छेडछाडीचा बळी ठरल्या आहेत. ही आकडेवारी कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी असून, पोलिस प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय धोरणामुळे शहरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
शहरातील मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणं, बाजारपेठा, शिक्षण संस्थांच्या भोवतालचा परिसर, अंधाऱ्या गल्ल्या — सायंकाळ आणि रात्रीच्या वेळेस महिलांसाठी धोकादायक ठिकाणं बनली आहेत. पीडित तरुणींच्या सांगण्यानुसार, दोन-तीन जणांच्या टोळक्यांनी अश्लील शेरेबाजी, अंगाला हात लावणे, हात पकडणे, टपली मारणे , पट्ट्याने मारणे ,विकृत हावभाव करत महिलांना छेडण्याचे प्रकार खुलेआम चालू आहेत. शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेस तर या विकृतांची हिम्मत अधिकच वाढलेली दिसते.
शहराच्या मध्यवर्ती भागातच हे प्रकार घडत असताना पोलिसांची गस्त कुठे आहे, हा प्रश्न उभा राहतो. तक्रार करूनही पोलिस काहीच करत नाहीत, अशी थेट तक्रार अनेक पालक आणि नागरिकांनी केली आहे. काही तरुणींनी मानसिक त्रासामुळे शिक्षण बंद करण्याचा विचार केला असून, हे प्रशासनाच्या अपयशाचं ज्वलंत उदाहरण आहे.
पोलिसांनी ‘चौकशी सुरू आहे’ असं ठराविक उत्तर देणं पुरेसं नाही! या घटनांची सातत्यता पाहता, प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ चौकशी नाही, तर गुन्हेगारांना तत्काळ अटक, गस्तीत वाढ, सीसीटीव्ही नियंत्रण आणि गुप्त पोलिस बंदोबस्त हे तातडीचे उपाय राबवणं अत्यावश्यक आहे.
शिरवळमध्ये महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि याला जबाबदार कोण? पोलिस प्रशासन जर आता जागं नाही झालं, तर नागरिकांचा संयम सुटू शकतो. सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर कारवाईचा दबाव आणायला सुरुवात केली असून, आता प्रशासनाची परीक्षा सुरू झाली आहे.
गुन्हेगारांवर कारवाई सुरू — एकजण अटकेत
दरम्यान, शिरवळ पोलिसांनी एका छेडछाड प्रकरणी शुभम दिलीप गुळमे (वय २४), व्यवसाय नोकरी, सध्या राहणार शिर्के कॉलनी, शिरवळ (मूळ गाव माळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यास अटक केली असून, त्याच्यासोबत इतरांचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र, एका आरोपीची अटक ही पुरेशी कारवाई नाही. जेव्हा शहरात सातत्याने अशा घटना घडत आहेत, तेव्हा अधिक कडक आणि व्यापक पावले उचलणं गरजेचं आहे.
निर्भया पथकाला या बाबत कल्पनाच नाही?
शिरवळ मध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत.यातील ठराविक घटना सोडता निर्भया पथकाला या बाबत कल्पना देखील नसल्याचे निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्वरित कारवाई करीत आहोत. महिलांनी देखील सतर्क राहून असा काही प्रसंग घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करणे अपेक्षित आहे. सद्यस्थित पेट्रोलिंग वाढवले असून तक्रार असलेले सर्व आरोपी आम्ही लवकरच पकडू… यशवंत नलावडे – पोलिस निरीक्षक शिरवळ