शिरवळ: हे औद्योगिक प्रगतीच्या मार्गावर असलेले गाव सध्या पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेमुळे अडथळ्यांत सापडले आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणारे पोलिसच आता अवैध धंद्यांचे रक्षक झाले आहेत, असा संतप्त सूर सध्या परिसरात उमटू लागला आहे.गावात अंमली पदार्थ, मटका, बिंगो जुगार, हातभट्टी दारू आणि ऑनलाईन सट्टा यासारखे गैरकृत्य खुलेआम सुरू असून, पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शिरवळ पोलिस ठाण्यातील गोंधळ, निष्काळजीपणा आणि अव्यवस्थेची चर्चा सुरूच होती. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून काही बदल केले, पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली. नवीन पोलिस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवस कारवाईचा फार्स केला. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे.
“हप्त्याच्या रक्षणासाठीच पोलिस?”
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध व्यवसायांना पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मूक पाठिंबा मिळत आहे. तर पोलिस निरीक्षकांच्या मूक संमतीने काही विशिष्ठ कर्मचारी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मटका व्यावसायिकांकडून महिन्याला किमान ₹1,35,000 तर भंगार व्यावसायिक आणि काही कारखान्यांकडून ₹3 ते ₹4 लाखांपर्यंत हप्ता गोळा केला जातो, अशी माहिती पुढे येत आहे. इतर ठिकाणचा मिळून हप्ता तब्बल ₹8 ते ₹10 लाखांपर्यंत पोहोचतो.
“नव्याचे नऊ दिवस संपले!”
सुरुवातीला निरीक्षकांनी काही अवैध व्यवसायांवर कारवाई करून लोकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोंडी आदेशावर आलेले असल्यामुळे बदलीच्या भीतीने ते दीर्घकालीन उपाय योजनांपासून लांब राहत असल्याचे स्पष्ट होत आहे. बदल्याची शक्यता लक्षात घेता, त्यांनी पुन्हा एकदा ‘प्रोटोकॉल’ चालू केला आहे, अशी नागरिकांत चर्चा आहे.
“हॉटेलमध्ये मीटिंग प्रकार काय” ?
पोलिस निरीक्षक कार्यालयात कमी आणि हॉटेल व खासगी ठिकाणी ‘मीटिंग’मध्ये अधिक वेळ घालवत असल्याचे अनेकांनी सांगितले. कार्यालयीन वेळेत नागरिकांची गाऱ्हाणी ऐकण्याऐवजी, निरीक्षक स्वतःचे फायद्याचे व्यवहार पाहत आहेत. तर काही तक्रारदारांना तर एका विशिष्ट व्यक्तीला भेटून ‘ त्याचा सल्ला घ्या’ नंतर तक्रार द्यायला या असे कानमंत्र दिले जात आहेत.
“कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ निरीक्षकाची गरज”
शिरवळमधील नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे उध्वस्त होत चालला आहे. जनतेला पोलीस निरीक्षकाच्या रूपाने नेहमीसाठी एक जबाबदार, भ्रष्टाचारमुक्त आणि कार्यक्षम अधिकारी हवा आहे, अशी ठाम मागणी सध्या नागरिकांतून होत आहे.