शिरवळ (ता. खंडाळा) | शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सध्या चर्चेचा आणि जनतेच्या रोषाचा केंद्रबिंदू बनले आहेत. पोलीस निरीक्षक पदाच्या प्रतिष्ठेला मुरड घालणाऱ्या त्यांच्याकडून सेवा निष्ठेपेक्षा थाट मांडण्याला जास्त महत्त्व दिले जात असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
सर्वसामान्य नागरिकांकडून जर हेल्मेट न वापरणे, नंबरप्लेट नसलेली दुचाकी चालवणे असे प्रकार घडले, तर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु याच पोलीस निरीक्षकांनी स्वतःच नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून वावरण्याचे दृश्य पाहायला मिळाल्याने, कायदा सर्वांसाठी सारखाच असावा हा नियमच त्यांच्या बाबतीत लागू होत नाही, हे स्पष्ट होते. ही दुहेरी भूमिका म्हणजे कायद्याची आणि लोकशाही मूल्यांची सरळ थट्टाच म्हणावी लागेल.
पोलिस स्टेशन मध्ये एसी लावण्यास बंदी असताना व कोणती परवानगी नसताना निरीक्षकांच्या केबिनमध्ये एसीची थंड हवा, बंद दरवाजे आणि भेटीसाठी प्रोटोकॉल – सामान्य जनतेसाठी हीच आता पोलिसांची प्रतिमा उरली आहे. नागरिकांनी तक्रार नोंदवायची म्हटली, तर अनेक पायऱ्या, परवानग्या आणि शेवटी मिळणारी वागणूक तीही संशयाच्या नजरेने! हा पोलीस ठाणे आहे की राजकीय दरबार, असा प्रश्न अनेकांना पडतो.
या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, संबंधित निरीक्षकांचे स्थानिक अवैध व्यावसायिकांशी घनिष्ठ स्नेहसंबंध. काही दिवसांपूर्वी एका खासगी हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या मेजवानीत काही कुख्यात व्यक्तींचाही सहभाग असल्याचे वृत्त समोर आले आहे. कायद्याचे रक्षकच जर गुन्हेगारीच्या सावलीत बसले, तर न्याय कुणाकडून मागायचा?
या ठाण्याची आणखी एक दाहक वास्तव म्हणजे – जो नागरिक फिर्याद घेऊन येतो, त्यालाच संशयित गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. त्याला प्रश्नांच्या फैरी झेलाव्या लागतात, वेळा मागितल्या जातात आणि तक्रार नोंदविणे जणू शिक्षा भोगण्यासारखे वाटू लागते. परिणामी, नागरिकही तक्रारी नोंदवण्यापेक्षा गप्प राहणे पसंत करतात.
दरम्यान, शिरवळ पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची माहिती प्रसार माध्यमांना न देण्याचा आणि त्यांच्या पासून संबंधित माहिती लपविण्याचा नवीनच पायंडा संबंधित पोलिस निरीक्षकांनी मांडला आहे. तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फक्त एखाद्याच चांगल्या कामाची प्रेस नोट तयार करून पाठवण्याचे काम मात्र तत्परतेने केले जाते.
‘सातारा प्राईम न्यूज’ने पोलिस निरीक्षकांच्या निष्क्रियतेवर व त्यांच्या काही प्रकरणावर प्रकाश टाकताच, पोलीस निरीक्षकांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचे ‘तोंडी आदेश’ दिल्याची माहिती पुढे आली. मात्र ही कारवाई केवळ दिखावा होती. कोणतीही अधिकृत नोंद किंवा गुन्हा दाखल न करता, केवळ माध्यमांपासून बचाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
बातमी प्रकाशित होताच, निरीक्षकांचे हप्ते वसुली करणारे कलेक्टर पुन्हा सक्रीय झाले. काहींना ‘सावध रहा’, काहींना ‘बाहेरून बंद, आतून सुरू’ अशा सूचनांची मालिकाच सुरू झाली. ही हालचालच सगळं काही पूर्ववत सुरू राहील, याची निशाणी होती.
एकंदरीत, शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक हे कायद्यानुसार काम करणारे अधिकारी नसून, कायद्याच्या वरती बसून स्वतःच्या फायद्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करणारे ‘सत्तांध’ अधिकारी असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे.