शिरवळ : शिरवळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने शहर व परिसरातील सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील तरुण पिढी व नागरिक दारू, मटका, गुटखा, चरस, गांजा, एम.डी. पावडर यांसारख्या व्यसनांच्या आहारी जात असल्यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून संपूर्ण समाज धोक्यात येऊ लागला आहे. या चिंताजनक परिस्थितीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने दारूबंदी तसेच सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर केला. या निर्णयामागील उद्देश म्हणजे समाजात शिस्त, सुरक्षितता आणि व्यसनमुक्तीचे वातावरण निर्माण करणे. दारू व नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचवणे आणि त्यांना सकारात्मक मार्गावर नेणे ही काळाची गरज असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
गावात चालणारे दारूविक्रीचे अड्डे, मटका, चक्की, गुटखा व इतर अवैध व्यवसायामुळे केवळ तरुणच नव्हे तर कुटुंब व एकंदर सामाजिक रचना ढासळू लागली आहे. या विरोधात ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे. पुढील काही दिवसांत जनजागृती मोहिमा, ग्रामसभांमधून चर्चासत्रे तसेच प्रत्यक्ष कारवाईच्या माध्यमातून या मोहिमेला गती देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीने नागरिकांना स्पष्टपणे कळवले आहे की, या अभियानात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हा लढा यशस्वी होऊ शकणार नाही. गावातील तरुण पिढीला वाचवण्यासाठी तसेच समाजातील अनुशासन टिकवण्यासाठी ही वेळ एकदिलाने उभे राहण्याची गरज आहे.
शिरवळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे गाव व्यसनमुक्त, सुरक्षित व निरोगी समाजव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“शिरवळला व्यसनमुक्त करणे हे केवळ ग्रामपंचायतीचे नव्हे तर प्रत्येक गावकऱ्याचे कर्तव्य आहे. व्यसनामुळे तरुणाई उद्ध्वस्त होत आहे. आपण सर्वांनी एकदिलाने या मोहिमेत सहभागी व्हावे,”
— अजिंक्य कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
“गावाच्या भविष्यासाठी दारूबंदी व अवैध धंदे बंद करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत या बाबतीत ठाम आहे. ग्रामस्थांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,”
— रविराज दुधगावकर, सरपंच शिरवळ