Uday Samant on Aditya Thackeray : दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक आर्थिक परिषदे’साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिष्टमंडळ जात आहेत. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सरकारवर हल्लाबोल केला आहे. आधी ५० खोके आता ५० लोक दावोस दौऱ्याला जात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. त्यांच्यासह ५० लोक दावोस दौऱ्याला जात आहेत. आधी ५० खोके आता ५० लोक दावोस दौऱ्याला जात आहेत. ५० मधील १० जणांना परराष्ट्र आणि वित्त मंत्रालयाने परवानगी दिली आहे. बाकीच्या लोकांची परवानगी घेतली का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला होता.
उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब
यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “पोलिसांच्या माध्यमातून उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणाऱ्यांनी उद्योग कसे वाढवावे आणि किती लोकांचे शिष्टमंडळ दावोसला जाणार याचं मार्गदर्शन करण्याची गरज नाही. ‘एमआयडीसी’चे १४ जण आणि ‘एमएमआरडीए’च्या ५ जणांचं शिष्टमंडळ दावोसला गेलं आहे. तर, ३ जण स्वर्खचाने दावोसला गेले आहेत. यावर आक्षेप घेण्याचं कारण काय? ज्यांनी कधीही स्वत:च्या खिशातून पैसे काढले नाहीत, त्यांना आक्षेप घेऊ वाटत असावा.”
“दावोस दौरा कमी पैशात झाला आहे”
“आदित्य ठाकरेंनी २१ तारखेपर्यंत वाट पाहायला हवी होती. नक्की किती खर्च झालाय, हे पाहायला हवं होतं. यंदाचा दावोस दौरा कमी पैशात झाला आहे. शिष्टमंडळ मोठं असलं तरी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमआयडीसी’ विभाग करार करणार आहेत. स्वत:च्या खर्चाने दावोसला जाणाऱ्यांवर आक्षेप असण्याचं कारण नाही,” असं उदय सामंतांनी म्हटलं.
“एकनाथ शिंदे दावोसमधून ऐतिहासिक करार करून परततील”
“एकही रूपयांचा अपव्यय होणार नाही, याची हमी मी देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधून ऐतिहासिक करार करून परततील. उद्योजकांना वातावरण चांगलं लागतं,” असंही सामंतांनी सांगितलं.
“आदित्य ठाकरेंनी जतनेची दिशाभूल करणं सोडावं”
“वाघनखे आणण्यासाठी गेलो होतो, तेव्हा माझा खर्च ‘एमआयडीसी’नं केल्याचं उठवलं. नंतर तीन दिवसांनी तोंडघशी पडले. मी वडिलांच्या खात्यातून पैसे भरले होते. कारण, आल्यानंतर सांगता येईल की वडिलांच्या पैशाने परदेश दौऱ्यावर गेलो होतो. आता आदित्य ठाकरेंनी जतनेची दिशाभूल करणं सोडावं,” असंही उदय सामंतांनी बजावलं आहे.