महाबळेश्वर / प्रतिनिधी : वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या किटलीचा जोर वाढू लागला आहे. महाबळेश्वर शहरासह तापोळा, कांदाटी या गावांमध्ये त्यांनी दौरा करत प्रत्यक्ष गावभेटी घेतल्या. सामान्य घरातून आलेल्या पुरुषोत्तम जाधव यांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे म्हणून जनतेने ठाम पाठिंबा दर्शवला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे झालेल्या गावभेटीत जाधव यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, “महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ४७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र विद्यमान निष्क्रिय आमदार श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात आहेत. १९९९ ते २०१४ या काळात त्यांच्याच नेत्याचे सरकार असतानाही त्यांना विकासासाठी निधी मंजूर करता आला नाही, कारण त्यांच्याकडे विकासाचे व्हिजनच नव्हते. आज जनता त्यांच्या भूलथापांना न बळी पडता परिवर्तन घडवण्याच्या मूडमध्ये आहे,” असे त्यांनी सांगितले.
लाभनायक नेत्याच्या कारवायांचा पर्दाफाश?
महाबळेश्वर तालुक्यातील झाडांनी येथे एका वळवी नामक व्यक्तीने ४० एकरात रिसॉर्ट उभारताना हजारो झाडांची अवैधपणे कत्तल केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला असला तरी लाभनायक नेत्याने त्यावर कोणतीही कारवाई करण्याची मागणी केली नाही. उलट, बाहेरून आलेल्या वळवीच्या रिसॉर्टसाठी जिल्हा नियोजन समितीतून तत्काळ ५२ लाखांचा निधी मंजूर केला गेला. त्यामुळे, जनतेच्या निधीचा वापर एका धनाढ्य व्यक्तीच्या विकासासाठी केला जात असल्याचा आरोप होत आहे.