शिरवळ: गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी खंडाळा तालुक्यात होणारी विविध विकासकामे दर्जाहीन स्वरुपाची करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे करण्यात येत असलेल्या कामांची शासनाच्या गुणवत्ता विभागाकडून तपासणी करण्यात यावी तसेच संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या फंडातून गावागावात सभा मंडप, अंतर्गत रस्ते कॉक्रटिकरण, गटारे व रस्त्यांच्या कामे करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून केली जात आहे. यामधील बहुतांश कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून होत आहेत. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार प्रशासकाकडे असल्याने या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले असल्याचे यादव यांनी सांगितले. तसेच निकृष्ठ व दर्जाहिन काम करीत केवळ टक्केवारी गोळा करण्यात खंडाळा तालुक्याच्या अभियंत्यांनी धन्यता मानली असल्याचा गंभीर आरोप देखील यादव यांनी केला आहे.
मिरजेवाडी येथे विधानपरिषदेचे आ. मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रटिकरणासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामास कोणताही दर्जा नाही. यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी तेरी भी चूप मेरी भी चूप असा सूर आवळताना दिसत आहेत. असाच प्रकार संपूर्ण तालुक्यात सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले. त्यामुळे झालेल्या कामांची तपासणी गुणवत्ता विभागाकडून करण्यात यावी म्हणजे अधिकाऱ्यांचे हात डांबरात किती काळे झाले आहेत, हे सर्व जनतेसमोर येईल.
….अन्यथा तोंडाला काळे फासणार
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या खंडाळा कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता राजकिय अभय मिळणार असेल आणि जनतेच्या पैशाने या मस्तवाल अधिकाऱ्यांनी आपले घर भरण्याचे काम सुरुच ठेवले, तर आगामी काळात ज्या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम सुरू असेल त्याच ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाणार असल्याचा इशारा यादव यांनी दिला आहे.