सातारा: महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री म्हणून नियुक्त झालेले जयकुमार गोरे यांचे आज सातारा जिल्ह्यात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. सातारा-पुणे महामार्गावर निरा नदी पुलाजवळ हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
यानंतर मंत्री गोरे यांनी नायगाव येथील सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकाला भेट दिली आणि स्मारकाच्या विकासासाठी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “सावित्रीमाईंच्या स्मारकासाठी मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 100 कोटींची मागणी केली होती. कालच मी मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली असून तीन तारखेला ते स्वतः नायगावला येणार आहेत. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकासाठी निधी मंजूर केला जाईल.”
जयकुमार गोरे यांनी नायगावच्या पवित्र भूमीचा विकास आणि सावित्रीमाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. “हे स्मारक केवळ सातारा जिल्ह्यासाठीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीमाईंच्या स्मारकाच्या विकासासाठी ही घोषणा ऐकून उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.