सातारा: तब्बल ४५ वर्षांनंतर वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाचा सन्मान मिळाला असून, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांचा उद्या (बुधवार, २५ डिसेंबर) सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत होणार आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या अधिकृत जिल्हा दौऱ्याची सर्वत्र उत्सुकता आहे.
मकरंद पाटील यांच्या स्वागतासाठी सकाळी ९ वाजता शिंदेवाडी येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे. यानंतर शिरवळ, खंडाळा, वेळे येथून कवठे येथे ते प्रवास करणार असून, किसनवीर आबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. यानंतर भुईंज, पाचवड, उडतारे, विरमाडे (आनेवाडी टोलनाका), लिंब फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, उंब्रज मार्गे कराड येथे प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी ते अभिवादन करतील.
मकरंद पाटील यांचा जनसंपर्कावर भर
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना राबविणाऱ्या मकरंद पाटील यांनी नागपूर अधिवेशनात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांनी आपले कामकाज यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबा यांच्या विचारांशी जोडून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. “सर्वसामान्य जनतेच्या समस्या आणि विकासकामे या केंद्रस्थानी असतील,” असे त्यांचे म्हणणे आहे.
थेट संपर्काने जनतेचा विश्वास वाढणार
दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या वारसाला मंत्रीपदाचा मान मिळाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे. सर्वसामान्य लोकांना थेट मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याने त्यांच्या समस्या अधिक सहजपणे सोडवल्या जातील, अशी जनतेला खात्री आहे.
जिल्ह्यातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण
मकरंद पाटील यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिक सज्ज झाले आहेत. मंत्रीपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा कशी करायची हे मकरंद पाटील कृतीतून दाखवतील, असा विश्वास जिल्हावासीयांना वाटतो.