खंडाळा : पारगांव खंडाळा येथे पुणे-बंगळूर महामार्गालगत सेवा रस्त्यावर आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली.
रामनरेश रामजी यादव (वय ३०, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. केसुर्डी फाटा, ता. खंडाळा) असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे, तर रोहन महादेव यादव व नारायण जगन्नाथ यादव (दोघे रा. पारगांव, ता. खंडाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, महामार्गावरील केसुर्डी व पारगांव दरम्यानच्या सेवा रस्त्यावरून रामनरेश यादव हा दुचाकी (एमपी-४६-एमजे-४९६८) वरुन रविवारी सकाळी ११ च्या सुमारास भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी रोहन महादेव यादव व नारायण जगन्नाथ यादव यांची दुचाकी (एमएच-११-डीआर-८२११) यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली. यात रामनरेश रामजी यादव यांचा मृत्यू झाला तर रोहन महादेव यादव व नारायण जगन्नाथ यादव हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारसाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले, अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू अहिरराव, ठाणे अंमलदार प्रकाश फरांदे, संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सूरज ज्ञानेश्वर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार संजय जाधव करत आहेत.