शिरवळ (ता. खंडाळा) : शिरवळ परिसरात अवैध गुटखा साठा व विक्री प्रकरणावर पोलिसांनी सातत्याने कारवाई करत असताना, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शिरवळ पोलिसांनी मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे ही कारवाई करून आरोपीस पुण्यातून ताब्यात घेतले. पोलिस त्याला आज रात्रीपर्यंत शिरवळ येथे घेऊन येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
यापूर्वी शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये दोन गाळ्यांमध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा साठा आणि गुटखा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या कारवाईत तब्बल १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी आठ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार होता, मात्र पोलिसांनी कसून तपास करून त्याला अखेर पुण्यातून अटक केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिरवळ परिसरात गुटख्याच्या अवैध साठ्यावर आणि विक्रीवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले होते. नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांविरोधात मोहिम राबवली. आरोपींच्या अटकेमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.