शिरवळ, ता. ६ मार्च – शिरवळ पोलिसांनी आज दुपारी एका गोडाऊनवर छापा टाकत मोठी कारवाई केली असून, अंदाजे पन्नास लाख ते एक कोटी रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. शिरवळ पोलीस स्टेशनचे नूतन प्रभारी अधिकारी यशवंत नलावडे आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करत अवैध गुटखा साठ्याचा पर्दाफाश केला.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
शिरवळ पोलिसांना काही दिवसांपासून गुटखा आणि पान मसाल्याची मोठ्या प्रमाणावर अवैध साठवणूक व विक्री सुरू असल्याची माहिती मिळत होती. यावरून पोलीस अधिकाऱ्यांनी यावर बारकाईने लक्ष ठेऊन छापा टाकण्याचे नियोजन केले. आज दुपारी शिरवळ पोलीस हद्दीतील एका गोदामात कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अवैध धंदा सुरू
महाराष्ट्र सरकारने राज्यात गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही अनेक ठिकाणी चोरीछुपे गुटखा साठवून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणातही पोलिसांना मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याचे आढळून आले. सध्या पोलिसांकडून मुद्देमालाची नेमकी किंमत मोजण्याचे आणि आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या कारवाईमुळे शिरवळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गुटखा पुरवठा करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे पन्नास लाख ते एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित आरोपींवर अन्न व औषध प्रशासन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.