शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिसांनी परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शिरवळ परिसरात भव्य पथसंचलन राबविण्यात आले.
पथसंचलनादरम्यान, पोलिसांनी शिरवळ परिसरातील विविध भागांतून संचलन करत नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यात विश्वास वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले.
या मोहिमेत संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देण्यात आले. बाजारपेठ, रहिवासी भाग, तसेच सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती अधिक विश्वास निर्माण झाला आहे.
शिरवळ परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे. “पोलिसांच्या या उपक्रमामुळे आमच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. पथसंचलनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला रोख लागेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक बसतो आणि परिसरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होते. यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.”गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस अशा मोहिमा भविष्यातही सातत्याने राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.