लोणंद : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील लोणंद-नीरा रस्त्यावर खड्ड्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. ६ जानेवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास माणिक सोना पेट्रोल पंपाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
मृत तरुणीचे नाव अंकीता अनिल धायगुडे (वय २०) असून जखमींमध्ये विशाल दौलत धायगुडे (वय २७) व सानिका विलास धायगुडे (वय १८) यांचा समावेश आहे. हे तिघेही बाळूपाटलाचीवाडी येथील रहिवासी असून दुचाकीने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा खड्ड्यात अपघात झाला. अंकीता धायगुडे हिचा जागीच मृत्यू झाला, तर विशाल व सानिका गंभीर जखमी झाले आहेत.
लोणंद-नीरा रस्त्यावर पालखी महामार्गावरील नगर पंचायतीच्या पाणी लाईनचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. संबंधित खड्ड्यास कोणत्याही प्रकारचे बॅरीगेट्स अथवा अडथळे उभारले नसल्याने वाहनचालकांना खड्डा दिसला नाही. परिणामी दुचाकी त्यात आदळल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
या अपघातामुळे पालखी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठेकेदाराची हलगर्जीपणा व स्थानिक प्रशासनाचा दुर्लक्ष यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदार व प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित खड्डे बुजवून योग्य सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.