फलटण : तालुक्यातील विडणी (ता. फलटण) परिसरातील २५ फाटा येथे शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा अर्धवट सडलेला मृतदेह आढळून आला आहे. या ठिकाणी गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ आणि काळी बाहुली आढळल्याने नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपास आणि घटनेचा उलगडा
शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. हिंस्र प्राण्यांनी मृतदेहाच्या काही भागांना ओढून बाहेर आणल्याने घटनास्थळावर स्थिती आणखी भीषण बनली होती. पोलिस पाटील शीतल नेरकर यांनी तात्काळ फलटण पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक आणि पोलिस उपनिरीक्षक मच्छींद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. फलटण ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करत तपासाला सुरुवात केली आहे.
घटनास्थळावरील तपशील
घटनास्थळी पोलिसांना मृतदेहाशेजारी गुलाल, कुंकू, काळी बाहुली, नारळ, दिव्याची वात यांसारखे साहित्य आढळून आले. त्यामुळे नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. तरीही या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळ पिंजून काढत पुरावे गोळा केले. ९-१० एकर ऊसाच्या क्षेत्रातील पुरावे शोधण्यासाठी संबंधित कारखान्याला ऊस तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तपासासाठी विशेष पथके दाखल
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळावरच करण्यात आले असून, मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.
फलटण तालुक्यात खळबळ
या प्रकारामुळे फलटण तालुक्यात घबराट पसरली आहे. नरबळीच्या शक्यतेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच घटनेशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या फलटण ग्रामीण पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून, लवकरच घटनेमागील सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.