शिरवळ : शिरवळ शहर आणि परिसरात अवैध गॅस रिफिलिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असून, याला स्थानिक पोलिस प्रशासनाचे संरक्षण मिळत असल्याची नागरिकांत रंगलेली पाहायला मिळत आहे. हा धोकादायक व्यवसाय दिवसाढवळ्या चालू असून, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, गुप्तचर पथकातील एका पोलिस शिपायाचे नाव वारंवार चर्चेत येत असून, तो या अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.
शहरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे सिलेंडर योग्य सुरक्षितता उपाय न पाळता भरले जात असल्याने, कधीही मोठा अपघात होऊ शकतो. मागील काही महिन्यांत विविध ठिकाणी गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायामुळे केवळ आर्थिक गैरव्यवहार होत नाही, तर लोकांच्या जिवावरही बेतण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात शिरवळ पोलीस ठाण्यातील गुप्तचर पथकातील एका पोलिस शिपायाचे नाव समोर येत असून, तो या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांकडून महिन्याकाठी मोठी रक्कम वसूल करत असल्याची माहिती मिळत आहे. हा शिपाई या व्यवसायाच्या मालकांना पोलिसांच्या धाडीतून वाचवण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे, पोलिस प्रशासन या अवैध व्यवसायाविरोधात ठोस पावले उचलणार का, हा मोठा प्रश्न आहे.
पुरवठा विभागाच्या कारवाई नंतर त्या पोलिस शिपायाच्या नावाची चर्चा?
खंडाळा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट कारवाई करत शिरवळ परिसरातील अवैध रित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोन व्यक्तींवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र शिरवळ पोलीस ठाण्यातील एका शिपायाचे नाव मात्र चर्चेला आले आहे. तो पोलिस शिपाई पोलिसांपासून तसेच इतर विभागांपासून संरक्षण मिळण्यासाठी या अवैध व्यवसायिकांकडून आर्थिक मोबदला घेत होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद
या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद वाटते. हा व्यवसाय नवीन नसून अनेक महिन्यांपासून सुरू असल्याने, स्थानिक पोलिसांना याची पूर्ण कल्पना असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे, वरिष्ठ अधिकारी संबंधित शिपायाला पाठीशी घालत आहेत का, अशी शंका उपस्थित झाली आहे.
कारवाई होणार की पाठराखण?
अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने, पोलिस आणि संबंधित यंत्रणांवर दबाव येण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत घातक आहे. अशा परिस्थितीत, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलिस शिपायावर कठोर कारवाई करणार का, की नेहमीप्रमाणे हे प्रकरण दबून जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतरही अनेक अवैध व्यासायिकांशी त्या पोलिस शिपायाच्या हितसंबंध..?
शिरवळ पोलिस ठाण्यातील तो पोलिस शिपाई नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयात समोर येत असतो. शिरवळ परिसरात सुरू असलेल्या अनेक अवैध व्यवसायांशी या पोलिस शिपायाच्या आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. अवैध व्यवसाय संदर्भात तक्रार झाल्यास लगेच त्या अवैध व्यवसायिकांना त्याची माहिती पोहोचून व्यवसाय तात्पुरते बंद करण्यात सांगण्याचे काम खबऱ्या सारखे या पोलीस शिपाई कडून होत असते. तर कारवाई करण्यासाठी गेल्यास सर्व काही पाहून डोळे झाक करण्याचे काम यांच्याकडून केले जाते. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले असून देखील या ठिकाणी अनेक व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला वरिष्ठांच्या परस्पर या शिपायाकडून केराची टोपली दाखवण्याचे काम केलं जात असल्याची चर्चा मात्र परिसरात आता रंगू लागली आहे.