शिरवळ : शिरवळ पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाचे मोठे आर्थिक हितसंबंध केवळ अवैध गॅस रिफिलींगमध्ये नाही, तर अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि बींगो यांसारख्या अनेक अवैध व्यवसायांशी आर्थिकदृष्ट्या जोडलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तर हप्ते वसुली केल्या बाबत त्या पोलिस शिपायाने कबुली देखील दिली असल्याचे समजले आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसल्याचे दिसत आहे, त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
अवैध व्यवसायांशी वाढलेली गुंतवणूक
शिरवळ पोलिस ठाण्यात एकूण अधिकाऱ्यांसह ५१ कर्मचारी कार्यरत असून, त्यात १ पोलिस निरीक्षक, २ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २ पोलिस उपनिरीक्षक, ९ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १७ पोलिस हवालदार, ३ पोलिस नाईक आणि १७ पोलिस शिपाई यांचा समावेश आहे. या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ३० गावे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संबंधित पोलिस शिपायाने या सर्व गावांमध्ये आपली पकड निर्माण केली आहे.
हा शिपाई अनेक अवैध धंद्यांशी संबंधित असून, त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवत आहे. अवैध गॅस रिफिलींगपासून सुरुवात करून त्याने हळूहळू अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि बींगो सारख्या अनेक अवैध व्यावसायिकांचे आर्थिक हितसंबंध जोडले आहेत. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या माहितीनुसार, तो या अवैध व्यवसायांतील लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतो आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतो.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न
संबंधित पोलिस शिपाई आपल्या आर्थिक फायद्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून या सर्व गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्याने आपल्या भागातील अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांशी जवळीक निर्माण केली असून, त्यांच्या संरक्षणासाठी मोठी रक्कम घेत असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही, तर तो पोलिस ठाण्यातील गोपनीय माहितीही बाहेर पोहोचवण्याचे काम करतो.
हा शिपाई ज्या विभागात कार्यरत आहे, त्या ठिकाणी त्याच्यासोबत आणखी तीन पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, तेही या अवैध व्यवहारात सहभागी आहेत का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, नागरिकांतून अशीही चर्चा सुरू आहे की, जर तो इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यवहारांमध्ये गुंतला असेल, तर इतर कर्मचारीही त्याला मूकसंमती देत असतील.
नागरिकांतून कारवाईची मागणी
या प्रकारामुळे संपूर्ण शिरवळ पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका पोलिस शिपायाने संपूर्ण भागावर आपली पकड बसवली आणि अवैध धंद्यांमध्ये गुंतला, तर त्याचा थेट परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी आणि या शिपायावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
जर वेळेत कारवाई झाली नाही, तर संपूर्ण पोलिस यंत्रणेवरच जनतेचा विश्वास उडेल, असे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून संबंधित शिपायाच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
संबंधित पोलिस शिपायाला आरोपी करा…
अवैध गॅस प्रकरणी दोन व्यक्तीवर कारवाई झाली या बाबत शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु आहे त्यामध्ये अनेक व्यक्ती सहभागी आहेत त्यानुसार यांना सहकार्य आणि या अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या त्या पोलिस शिपायाला देखील या प्रकरणात आरोपी करावा कारण नाय सर्वानाच सारखा आहे.
बातमी थांबवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न…
सदर शिपाया बाबत माहिती उघड होत असताना एका मुळे शिरवळ पोलीस स्टेशनची प्रतिमा डागळली जात आहे . आम्ही त्याला समजाऊन सांगू असे अनेक ठिकाणावरून अनेक प्रतिष्ठित व्यक्तीकडून बातमी थांबवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे…