शिरवळ (ता. खंडाळा) | शिरवळ पोलीस ठाण्याचा निष्क्रिय आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. नव्याने अधिकारी बदले असले तरी परिस्थितीत कोणताही बदल जाणवत नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “केवळ खुर्च्या बदलल्या, पण कारभार तोच!” अशा शब्दांत त्यांनी पोलीस प्रशासनावर हल्लाबोल केला.
गावात अंमली पदार्थ, मटका, बिंगो जुगार, हातभट्टी दारू आणि ऑनलाईन सट्टा यासारखे गैरकृत्य खुलेआम सुरू असून, पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. गुन्हेगार मोकाट फिरत असताना पोलिस मात्र मौन बाळगत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनुप सुर्यवंशी यांनी या निष्क्रियतेविरोधात मोहीम राबवत गावभर पत्रके वाटली. “शिरवळचे पोलीस झोपलेले नाहीत, त्यांनी झोप विकली आहे,” असा त्यांचा थेट आरोप आहे. पोलिसांवर दलालांशी आर्थिक साटेलोटे असल्याचेही आरोप देखील करण्यात आले आहेत.
या सगळ्या प्रकारामागे सत्ताधाऱ्यांची संमती आहे का? असा सवालही आता जनतेतून उपस्थित होतो आहे. त्यामुळे पोलीस आणि राजकीय नेत्यांतील संबंध तपासण्याची मागणीही जोर धरत आहे.
पोलीस ठाण्यात ‘हप्त्याचा’ खेळ?
“शिरवळ पोलीस गुन्हेगारांचे राखणदार झालेत का?” असा थेट सवाल पत्रकातून विचारत आहेत. बेकायदेशीर धंद्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने हे धंदे दिवसेंदिवस फोफावत आहेत. त्यामागे पोलिस आणि दलाल यांच्यातील गुप्त सौदे असल्याचा आरोप जनतेकडून होत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे अधिकारी, आणि सामान्यांच्या तक्रारी नोंदवण्यास टाळाटाळ करणारे कर्मचारी — यामुळे पोलिसांचा विश्वासच ढासळला आहे.
काय म्हणालेत पत्रकात अनुप सूर्यवंशी
सस्नेह नमस्कार 🙏,
वास्तविक आपणास आपल्या ग्रामदैवतेचे अर्थात श्री अंबिका मातेची छायाचित्र भेट देणे हाच प्रारंभिक हेतू होता. पण यामध्ये बदल करून यासोबत पत्र लिहिण्याचे ठरविले आहे म्हणून हा पत्रप्रपंच. मला आशा आणि खात्री आहे की आपण या पत्राचा गंभीरपणे विचार कराल. कारण आपण साक्षात आई भवानीचे रूप आहात.
शिरवळ मध्ये सध्या बिंगो लॉटरी यासारख्या घातक ऑनलाईन जुगाराचे प्रचंड पेव सुटले आहे. यामुळे अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या डुबली आहेत हे आपण ऐकले असेल तसेच या दबावामुळे घरातील मंगळसूत्र, टू व्हीलर आदी वस्तू गहाण ठेवल्या जाऊन संसार उध्वस्त होत आहेत. पुरुष व्यसनाच्या आहारी जात आहेत. ती व्यसने सुद्धा खूप भयंकर आहेत एम डी पावडर, गांजा सह कुठले तरी इंजेक्शन आहे या अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे सुद्धा खूप भयावह अवस्था झाली आहे. या व्यतिरिक्त याच व अन्य कारणांमुळे तरुणपिढी व अल्पवयीन मुले इतर वाईट मार्गाचा वापर करत आहेत पण त्याचा उल्लेख मी करू शकत नाही.
मटका, बेकायदेशीर दारू, (हातभट्टी) सुद्धा मुबलक स्वरूपात आहेत अशा वेळी शिरवळचे पोलीस खाते सुद्धा कोणतीही ठोस कारवाई या दोन नंबरच्या धंद्यांच्या विरुद्ध करण्याच्या मानसिकतेत नाही. अगदी यामुळे माझी आपणास हात जोडून विनंती आहे की यावरील सर्व बाबी आपल्या उंबरठ्यावर येण्याअगोदरच आपण काळजी घ्या. घरातील कर्त्या व्यक्तीला याबाबत जागे करा तुम्ही स्वतः या विरुद्ध लढण्यासाठी सिद्ध व्हा.
शिरवळच्या उज्वल भविष्यासाठी आणि आप-आपल्या घराच्या सुखासाठी हे गरजेचे आहे अनेक जण या विषयावर लढण्यासाठी पुढे येत आहेत पण आपला आशिर्वाद पाठीशी असणे गरजेचे आहे, आणि वेळप्रसंगी सक्रिय सहभाग.
आपला लाडका भाऊ
अनुप सुर्यवंशी .