सातारा (संपादकीय): कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य असते. मात्र, खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलिस ठाण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसच अवैध व्यावसायिकांचे खबऱ्या बनत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे, ज्यामुळे पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
वाठार कॉलनी येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एका नागरिकाने डायल 112 वर तक्रार केली, परंतु पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास घेतला. या दरम्यान, व्यावसायिकांनी आपले बस्तान हलवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांशी व्यावसायिकांचा असा समन्वय नागरिकांना खटकत असून पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे.
तक्रारदाराचे नाव व्यावसायिकांपर्यंत पोहोचले?
सर्वात गंभीर बाब म्हणजे, तक्रारदाराचा तपशील थेट व्यावसायिकांपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. यामुळे तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसच अशा प्रकारे गोपनीय माहिती लीक करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वाठार कॉलनी – अवैध व्यवसायांचे केंद्र
वाठार कॉलनी हे “अवैध व्यवसायांचे हब” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. काही पोलिस अधिकारी कर्मचारी थेट व्यावसायिकांना सहकार्य करत असल्याचे आरोप होत आहेत. अशा घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या नैतिक कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांचा संताप आणि कारवाईची मागणी
लोणंद परिसरातील जागरूक नागरिकांनी पोलिसांवरील नाराजी व्यक्त करत दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. “जर पोलिसच अवैध व्यावसायिकांना संरक्षण देत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे धाव घ्यायची?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. क्रमशः