शिरवळ : शिरवळ पोलिस ठाण्यातील वाहतूक विभागामार्फत ३६ वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देणे हा आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलीस अंमलदार तुषार अभंग, भाऊसाहेब दिघे, नितीन नलवडे, अरविंद बाराळे, व अभिजित काशीद यांनी स्थानिक वाहनचालक व प्रवाश्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्व पटवून देत त्यांना रस्ते सुरक्षेबाबत सूचना दिल्या.
कार्यक्रमात विशेषतः सीट बेल्टचा वापर, हेल्मेट घालणे, वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन चालवू नये अशा महत्त्वाच्या नियमांवर भर देण्यात आला. नागरिकांना याबाबत माहितीपत्रकेही वितरित करण्यात आली. तसेच, वाहनचालकांना त्यांची जबाबदारी समजावून देण्यासाठी थेट संवाद साधण्यात आला.
पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने वाहतूक सुरक्षेच्या नियमांना प्राधान्य दिल्यास रस्ते अपघात टाळता येतील.”
शिरवळ पोलिस ठाण्याच्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमाद्वारे वाहतूक पोलिसांनी एक आदर्श निर्माण केला आहे. रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.