शिरवळ (ता. खंडाळा) : पळशी येथील मिरजे रोडलगत असलेल्या माळरानावर प्लॅस्टिक मटेरियल जाळल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होण्यासह गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी मोहन करशनदास दुकेर ऊर्फ भानुशाली (वय 55, रा. तारांगण सोसायटी, रोहीणी बिल्डिंग, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा, मुळगाव – असलफा व्हिलेज, घाटकोपर, मुंबई) याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळशी गावाच्या हद्दीत असलेल्या मारुती सिदू भरगुडे यांच्या माळरानावर मोहन करशनदास दुकेर ऊर्फ भानुशाली (वय 55, रा. तारांगण सोसायटी, रोहीणी बिल्डिंग, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा, मुळगाव – असलफा व्हिलेज, घाटकोपर, मुंबई) यांनी गोडाऊनमधून आणलेले प्लॅस्टिक मटेरियल खुलेआम जाळले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि दुर्गंधी निर्माण झाली. परिणामी, पळशी व मिरजे परिसरातील नागरिकांना तसेच त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांना श्वसनासंबंधी त्रास होऊ लागला.
या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून, जाणीवपूर्वक वातावरण दूषित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विषारी धुरामुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. असे असूनही, प्लॅस्टिक मटेरियल जाळण्याची घातक कृती करण्यात आली.या प्रकरणी प्रिया अविनाश दगडे (वय 32, व्यवसाय – पोलीस पाटील, रा. पळशी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्या तक्रारीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.