पुणे : गँगस्टर शरद मोहोळचा गेम करण्यासाठी आरोपींनी गेल्या दीड वर्षांपासून प्लॅनिंग केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, प्लॅनिंगनंतर आठ जणांनी पिस्टल आणले आणि त्याच पिस्टलमधून जुलै २०२२ व ऑगस्ट २०२२ अशा दोन वेळा वेगवेगळ्या दोन ठिकाणी गोळीबाराचा सरावदेखील केल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी गोळीबाराचा सराव केल्याप्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे केले आहेत.
पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून ते झीरोने पौड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, आदित्य गोळे, नितीन खैरे, सतीश संजय शेंडगे यांच्यासह त्यांच्या मित्रांचा समावेश आहे.
दोन वकिलांसह आठ जणांना अटक
गँगस्टर शरद मोहोळचा (दि. ५ जानेवारी) गेल्या आठवड्यात शुक्रवारी भरदुपारी घरासमोरच तिघांनी गोळ्या झाडून खून केला. गुन्हे शाखेने आठ तासांत दोन वकिलांसह आठ जणांना अटकदेखील केली. प्रथम आर्थिक वादातून तसेच साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व नामदेव कानगुडे यांना केलेल्या मारहाणीतून खून झाल्याचे सांगितले जात होते. परंतु, हा खून टोळी युद्धातून झाल्याचा संशय आहे. त्यामुळे गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला. गुन्हे शाखेने तपासात प्रगती केली आहे.
दोन ठिकाणी मध्यरात्री गोळीबाराचा सराव
त्यासोबतच आता मुन्ना पोळेकरने २०२२ पासूनच शरद मोहोळच्या खुनाचे प्लॅनिंग केल्याचे समोर आणले आहे. त्यासाठी त्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पिस्तूल खरेदी करून हाडशी भागात दोन ठिकाणी मध्यरात्री गोळीबाराचा सराव केला आहे. त्यामुळे मुन्ना पोळेकर व नामदेव कानगुडे यांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शरद मोहोळच्या खुनाचे प्लॅनिंग केल्याचे दिसत आहे. गोळीबाराचा सराव हा सात ते आठ जणांनी केला आहे. त्यानुसार या सर्वांचा शोध सुरू केला आहे. यामुळे शरद मोहोळचा खून करण्यामागे अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
मास्टर माईंडला, निरोप द्या
मुन्ना पोळेकरला पिस्तूलासाठी आर्थिक रसद पुरविणाऱ्यांची माहिती उघड झाल्यानंतर आता ते पिस्तूल देणाऱ्याची माहितीदेखील समोरही आली असून, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यासोबतच मुन्ना पोळेकरने संतोष कुरपे याला खुनानंतर फोनवर “मास्टर माईंडला, निरोप द्या. शरद मोहोळचा गेम झाला आहे,” सांगितल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे यातील मास्टर माईंड कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु, पोलिसांनी आता तपासात गती आणत मास्टर माईंडच्या दिशेने तपास सुरू केला आहे.
झाडाच्या बुंद्यावर गोळीबाराचा सराव
मुन्ना पोळेकर व साथीदारांनी हाडशीतील दोन अडीच किलोमिटर अंतरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोकळ्या जंगलात गोळीबाराचा सराव केला आहे. झाडाच्या बुंद्यावर त्यांनी गोळ्या झाडून निशान साधण्याचा सराव केला आहे. या सरावात सात ते आठ जण सामील होते. त्यामुळे त्यांचाही शरद मोहोळ खूनात सहभाग असल्याचे समोर आले आहे. आता त्यांचा शोध सुरू केला आहे.