शिरवळ : शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील महिला दक्षता व शांतता कमिटी सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महिलांनी त्यांच्या विविध समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी उपाययोजनांवर सखोल चर्चा केली. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि स्थानिक कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांसोबत अधिक जवळून काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां अंबिका देशमाने, डॉ. धुमाळ, हेमलता शेटे, सीमा पवार, पार्वती बिराजदार, वैशाली नेवसे, छाया माळवे, सीमा तावडे, आदर्श विद्यालय मुख्याध्यापिका यादव, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर महिलांनी पोलिसांसोबत स्थानिक बाजारपेठ परिसरात पाई पेट्रोलिंग केले. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत, मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात पोलिसांना मदत केली. या प्रयत्नांमुळे बाजारपेठेतील वाहतूक शिस्तबद्ध होण्यास मदत झाली.
महिलांनी भविष्यातही वाहतूक व्यवस्थापन व पोलिसी कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली. कायदा-सुव्यवस्थेच्या प्रक्रियेत महिलांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या सक्रीय सहभागामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल, असे बैठकीतील सदस्यांचे मत होते.
शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी महिलांच्या या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. महिलांचा सहभाग केवळ बैठकीपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास समाजात सकारात्मक बदल घडवता येईल, असे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या वतीने महिला दक्षता कमिटीला आवश्यक त्या सर्व सहकार्याची हमीही त्यांनी दिली.
ही बैठक आणि त्यानंतरचा उपक्रम स्थानिक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. पोलिसांसोबत मिळून रस्ते सुरक्षा आणि शिस्तबद्ध वाहतूक यासाठी महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला. भविष्यात अशा अधिक उपक्रमांचे आयोजन करून पोलिस आणि नागरिक यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे बैठकीच्या शेवटी मांडण्यात आले.