खंडाळा (जीवन सोनवणे): शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा साठा आणि गुटखा बनविण्याचे साहित्य जप्त करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी मोहीम राबवत महिलांना एकप्रकारे अनोखी भेट दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत ६ मार्च २०२५ रोजी शिरवळमधील स्टार सिटी अपार्टमेंट येथील गाळ्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात ८३.१९ लाखांचा गुटखा, १८.५० लाखांचे गुटखा उत्पादन साहित्य व मशीन, तसेच ४.५० लाखांचे चारचाकी वाहन असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी या कारवाईत सुनील पुतन सिंह (नवले ब्रिज, पुणे), राहुल हरिलाल देपन (वय २४, हेल्पर), कन्हैयालाल काळूराम गेहलोत (वय ३०, हेल्पर), पुष्पेंद्र अकबाल सिंह (वय २८, हेल्पर), श्री. कामटे स्वप्निल नामदेव देवकर (चोरी मळा, जुन्नर, पुणे) व इतर ३ यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ४ जणांना अटक करण्यात आली असून, अवैध धंद्यासाठी वापरण्यात आलेले २ गाळे सील करण्यात आले आहेत.
सदर कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर, इम्रान हवालदार आणि प्रियंका वाईकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरवळ पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा हस्तगत केला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शिद, पोलीस अंमलदार शशिकांत भगत, धरमसिंग पावरा, सुधाकर सूर्यवंशी, तुषार कुंभार, सचिन वीर, सुरज चव्हाण, अरविंद बऱ्हाळे, भाऊसाहेब दिघे, दिपक पालेपवाड, तुषार अभंग, अजित बोराटे, सुधाकर सपकाळ आणि होमगार्ड संतोष इंगवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
शिरवळ पोलिसांची ही मोठी कारवाई सातारा जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यापारास मोठा धक्का देणारी असून, या पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.