शिरवळ : पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका प्रतिष्ठित खाजगी डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा शिरवळ पोलिसांनी छडा लावत दोन संशयितांना अटक केली आहे. नितीन नवनाथ प्रधान (वय 20) आणि दत्ता आप्पाराव घुगे (वय 24, दोघे रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम जलान अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरांचा परिसरातील तीन गावांमध्ये दवाखाना आहे. त्यांच्या दवाखान्यात काम करणारी 19 वर्षीय युवती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. याबाबत डॉक्टरांनी शिरवळ पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या मोबाईलवर युवतीसोबतचा एक आपत्तिजनक व्हिडीओ पाठवण्यात आला आणि त्यासोबत 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
डॉक्टरांनी तत्काळ हा प्रकार फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना कळवला. त्यांनी ही माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यापर्यंत पोहचवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट व पोलीस अंमलदार अजित बोराटे, अरविंद बार्हाळे, सुरज चव्हाण, प्रशांत धुमाळ, दिपक पालेपवाड, निलिमा भिलारे, स्नेहल शिंगटे यांच्या पथकाने सापळा रचला.
शिरवळ येथील रामेश्वर गार्डन येथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या प्रधान आणि घुगे या दोघांना संबंधित डॉक्टर व त्यांच्या पत्नीमार्फत 1 कोटीपैकी 1.50 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. संशयितांना शुभम जलान नावाचा इसम फोनवरून सूचना देत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.या प्रकरणी पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत. मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.