शिरवळ : शिरवळ येथील एका नामांकित कंपनीत कार्यरत 28 वर्षीय अभियंता तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अविनाश अशोक कोडक (वय 28 वर्षे) असून, तो मूळचा हांगिरगे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील रहिवासी आहे.
अविनाश शिरवळ येथील एका नामांकित कंपनीत सुपरवायझर पदावर काम करत होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरवळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
आत्महत्येच्या कारणाचा तपास सध्या सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, अविनाश हा कर्तव्यदक्ष व शांत स्वभावाचा होता. त्यामुळे त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.
त्याच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारचा बदल जाणवला नव्हता. मात्र, काही वैयक्तिक किंवा कामाशी संबंधित तणाव, कामातील काही व्यक्ती त्याच्या आत्महत्येमागील कारण असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरवळ पोलीस अधिक तपास करत असून, या घटनेने अविनाशच्या कुटुंबीय, सहकारी आणि मित्रांमध्ये शोककळा पसरली आहे. तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण लवकरच उघड होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.