शिरवळ (ता. खंडाळा) – गावातल्या नागरी सुरक्षेबाबत अनेकदा गंभीर पावले उचलली जातात, असा प्रशासनाचा दावा असतो. मात्र काही प्रकरणांमध्ये हीच यंत्रणा ‘सॉफ्ट हँडलिंग’ करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. २५ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिरवळ परिसरात घडलेली एक घटना हेच अधोरेखित करते.
पंढरपूर फाटा येथे झाडाच्या आडोशाला एक इसम गांजासारखा अमली पदार्थ पिताना आढळून आला. या इसमाचे नाव कैलाश जहांगीर सिंह (वय ४०), व्यवसायाने मजूर असून तो सध्या शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे राहत आहे. मूळचा तो मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील परेना गावचा आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम २७ नुसार सरकारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पण येथेच खरी कहाणी सुरू होते. अधिकृत कारवाईत दाखवले की कैलाश सिंह पंढरपूर फाटा येथे गांजा सेवन करताना पकडला गेला. मात्र प्रत्यक्षात हा इसम शिरवळ येथील शहाजी चौकात आपल्या कुटुंबासोबत रविवारी बाजारात वडापाव टपरीजवळ बसलेला होता. तेथे एका व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे झडती घेतली आणि एका गांजाच्या पुडीचा शोध लागला. ही पुडी कुठून आली, त्याने कोणाकडून विकत घेतली, याची चौकशी करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर गांजा सेवन करत असल्याची कारवाई दाखवून प्रकरण थोपवले.
हा प्रकार ‘सॉफ्ट हँडलिंग’ म्हणजेच सौम्य कारवाईच्या नावाखाली प्रत्यक्ष सत्य झाकण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. ‘डील’ झाल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे. जर एखादा गरीब मजूर गांजा विकत घेतो, तर तो कुठून घेतो, कोण त्याला विकतो, याचा मागोवा घेणे गरजेचे असते. त्याऐवजी केवळ छोटीशी पुडी मिळाल्यानंतर त्याच्यावर सरळ कलम २७ लावून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न हा संशयास्पद ठरतो.
प्रश्न उपस्थित होतो की, ही कारवाई खरी होती का? की ती केवळ दाखवण्यासाठी होती? अमली पदार्थांचा वापर आणि विक्री ही गंभीर समस्या आहे आणि अशा प्रसंगी ‘कनेक्शन’ शोधणे अधिक महत्त्वाचे असते. मात्र येथील पोलिसांनी ते टाळल्याचे दिसते.
स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. काहींच्या मते, पोलिसांनी मुद्दाम प्रकरण सौम्य करून एखाद्या मोठ्या मास्याला वाचवले. जर गांजा त्याच्याकडे आला होता, तर त्याच्या मूळ पुरवठादारापर्यंत पोहोचणे गरजेचे होते. पण तसे काही घडलेच नाही.अशा प्रकारांमुळे पोलिसांवरचा विश्वास डळमळीत होतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले. अमली पदार्थांचे जाळे स्थानिक पातळीवर पोहोचले असल्याचे ही घटना सूचित करते.
एकंदरीत, कारवाई एक आणि दाखवले काहीतरी वेगळे, हीच ‘सॉफ्ट हँडलिंग’ ची खरी ओळख. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि कठोरता आवश्यक आहे. अन्यथा अशा ‘डील’ मधून गावातील गुन्हेगारी अधिक बळकट होईल, असा धोका नाकारता येणार नाही.