खंडाळा ०९ प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील ग्रामीण जनतेची मुख्य आर्थिक आधारवड असलेल्या श्री लक्ष्मी निमनागरी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री लक्ष्मी विकास सहकार पॅनलने एकतर्फी वर्चस्व गाजवत विरोधी श्री लक्ष्मी विकास परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव केला. ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता आपल्या ताब्यात घेतली.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर खंडाळा शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मुख्य बाजारपेठेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण व डिजेच्या तालावर विजयी मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
खंडाळा शहरासह जिल्ह्यातील ५४ गावात गत बेचाळीस वर्षापासुन ग्रामीण जनतेला पतपुरवठा करणाऱ्या श्री.लक्ष्मी निमनागरी सहकारी पतपुरवठा संस्थेचा निवडणूकीत १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणुक रिंगणात आमने सामने उभे ठाकले होते. प्रचारा दरम्यान श्री.लक्ष्मी विकास सहकार पॅनल आणि श्री.लक्ष्मी विकास परिवर्तन पॅनल यांच्यातील जोरदार चुरस सभासद व जनतेनी अनुभवली.या निवडणूकीत खंडाळा,वाठार कॉलनी,भिलार या ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली . यामध्ये एकूण ३४२४ सभासदांपैकी २४२७ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदाना दिवशीच सायंकाळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी पार पडली. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गात प्रल्हाद खंडागळे (१४४२- मते),सुरेश खंडागळे (१४o२ – मते ),अशोक गाढवे (१४०५ मते ),विकास गाढवे (१४०१-मते), श्रीराम गाढवे (१४२७ – मते),अजिंक्य चौधरी (१३९५ मते), धनंजय फाटक (१३७५ – मते),संतोष भोसले (१३९९ – मते ).तसेच महिला राखीव मतदार संघातून उज्वला बळवंत खंडागळे (१४९६ – मते ), मंदाकिनी खंडागळे (१४४८ – मते ), इतर मागास वर्ग राखीव मतदार संघात विजय शेळके (१४१५- मते ),विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघामध्ये मोहन लांडगे (१४४८ मते), अनुसूचित जाती – जमाती राखीव मतदार संघातून योगेश संकपाळ ( १५५२- मते ) विजयी झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी तानाजी देशमुख यांनी केली.
या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी अनिरुद्ध गाढवे, तात्या नरुटे, शैलेश गाढवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भव्य विजयी मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा, डीजे आणि गुलालात न्हालेला संपूर्ण परिसर हे दृश्य लक्षवेधी ठरले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिस निरीक्षक सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.