सातारा: भुईंज हद्दीतून तिघांचे अपहरण करून त्यांना स्विफ्ट कारमध्ये बसवून कोरेगाव जवळील आदर्की गावाच्या हद्दीत सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी झालेल्या वादातून अपहरणकर्त्यांनी तिघांपैकी एकावर चाकूने हल्ला केला. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडवली असून, पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
भुईंज पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर विकास जाधव (वय २६, रा. शेते, ता. जावली) हा जुबेर शेख (रा. कुडाळ, ता. जावली) आणि अजय महामुलकर (ता. जावली) यांच्यासोबत भुईंज येथे आला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना गाडीत बसवले. नंतर वाठार (ता. कोरेगाव) नजीकच्या आदर्की गावाच्या हद्दीत या तिघांना गाडीतून ढकलून दिले.
यावेळी झालेल्या वादातून अपहरणकर्त्यांनी जुबेर शेख याला चाकूने जखमी केले. त्यानंतर मयुर जाधवला दहिवडी (ता. माण) येथील एका बंद घरात डांबून ठेवण्यात आले. मात्र, मयुरने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करून घरी पोहोचले. त्यांनी जखमी जुबेर शेख याची चौकशी करून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल केले.
या घटनेचा उद्देश अद्याप स्पष्ट नाही. भुईंज पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व गुन्हे प्रकटीकरण विभाग आरोपींच्या शोधात आहेत. मात्र, अद्याप संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.