शिरवळ : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सांगवी गावात कंपनी कामासाठी गाडी लावण्याच्या वादातून एकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सर्वेश शिवतारे, संताजी मोहन गायकवाड, अभिषेक ज्ञानेश्वर गायकवाड आणि ज्ञानेश्वर मोहन गायकवाड यांच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी देलीली घटनेची माहिती अशी की, दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सांगवी गावातील सरपंच सोमनाथ लोंखडे, उपसरपंच संदीप वीर, पोलीस पाटील संजय लोंखडे, संतोष वीर, समीर वीर, आणि सुनिल गायकवाड यांनी एका नामांकित कंपनीच्या एचआर यांच्याशी गावातील तरुणांना नोकरी लावणे आणि वाहने कंपनीमध्ये लावण्यासंदर्भात चर्चा केली. दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांनी कंपनीमधून बाहेर पडून गेटजवळ उभ्या त्यांच्या मोटारसायकलजवळ जाण्यास सुरुवात केली.
तेव्हा गावातीलच चार व्यक्ती सर्वेश शिवतारे, संताजी मोहन गायकवाड, अभिषेक ज्ञानेश्वर गायकवाड आणि ज्ञानेश्वर मोहन गायकवाड हे त्या ठिकाणी आले. यावेळी सर्वेश शिवतारे याने “तुझी पिकअप गाडी कंपनीला लावायची नाही. तू गाडी कशी लावतोस तेच मी बघतो,” असे म्हणत धमकी दिली. यानंतर, हातातील दारूची रिकामी बाटली पीडिताच्या डोक्यावर फोडून गंभीर मारहाण केली. त्यासोबतच संताजी गायकवाड आणि अभिषेक गायकवाड यांनी दगडाने डोक्यावर व पाठीवर प्रहार केला. ज्ञानेश्वर गायकवाड याने हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि धमकावले.
घटनेनंतर जखमी व्यक्तीने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. याप्रकरणी निबंध वीर यांच्या फिर्यादी नुसार चारही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.